Sunday, 11 March 2012

हाक परदेशी समाजसेवेची


महाराष्ट्राला फार मोठा समाजसेवेचा आणि प्रबोधनाचा वारसा लाभलेला आहे. फुले, शाहू, आंबेडकर, आगरकर, गाडगेमहाराज अशी कितीतरी नावे आपण मराठी भाषिक लोक अगदी सहजतेने घेत असतो. सुधारक विचारांची तसेच कृतींची परंपरा असलेले मराठी भाषिक देशाच्या व जगाच्या अन्य भागांमध्ये जाण्यात, नवीन अनुभव घेण्यात, शोध घेण्यात मात्र तितकेसे पुढे दिसत नाहीत. कोणे एके काळी अटकेपार झेंडे नेल्याचा आपल्याला अभिमान असला तरी ह्या आघाडीवर मात्र पुरोगामी महाराष्ट्र पिछाडीवरच म्हटला पाहीजे.
कृषि, आरोग्य, माहिती तंत्रज्ञान, शिक्षण, महिला विकास, ग्रामीण विकास अश्या अनेक क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्तम प्रतीचे मनुष्यबळ उपलब्ध आहे. आज आपणां महाराष्ट्रीयांना ह्या अनुभवांना अधिक विस्तृत करण्यासाठी जागतिक पातळीवर अनेक संधी उपलब्ध आहेत. ओव्हरसीज व्हॉलंटीयरींग ही अश्या काही संधींपैकीच एक आहे. आजमितीला अनेक आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था तसेच संयुक्त राष्ट्रसंघाच्या संस्था परदेशात जाऊन समाजसेवा करण्याची संधी देत आहेत. व्हॉलंटरी सर्विस ओव्हरसीज (व्हीएसओ) ही अशीच एक संस्था आहे. सदर लेखात व्हीएसओ मार्फत उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या ओव्हरसीज व्हॉलंटीयरींगची माहिती वाचकांना करून देत आहे.
सर्वप्रथम व्हॉलंटीयरींग म्हणजे काय ते माहीत करून घेऊया. स्वयंस्फुर्तीने जे सामाजिक काम केले जाते त्याला इंग्रजीमध्ये व्हॉलंटीयरींग म्हटले जाते. अश्या व्यक्तीला व्हॉलंटीयर असे म्हटले जाते. मराठीमध्ये व्हॉलंटीयरला स्वयंसेवक असा प्रतिशब्द आहे. जवळजवळ सर्वच समाजांत कमी अधिक प्रमाणात स्वयंसेवक प्रवृत्ती असतेच परंतु जागतिक पातळीवर पाहू गेल्यास मानव वर्ण, भाषा, धर्म, राष्ट्र अश्या अनेक घटकांद्वारे विभागला गेलेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर स्वयंसेवकी प्रवृत्तीला ह्या विभागणीमुळे मर्यादा येत असतात. ह्या मर्यादा पार करून जागतिक दृष्टिकोन ठेवून काम करण्याची खूप मोठी गरज आजच्या काळात आहे. व्हीएसओ ह्या संस्थेच्या स्थापनेचा उद्देश नेमका हाच आहे. मुळच्या ग्रेट ब्रिटन मधील ह्या संस्थेमार्फत आज जगातील १२ देशांमधून व्हॉलंटीयर निवडले जातात. आजमितीला दरवर्षी १४०० लोक जगातील ४० अविकसित व विकसनशील देशांमध्ये कार्यरत आहेत.
व्हीएसओ व भारतातील चेंज-एक्स ह्या दोन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयव्हीओ हा उपक्रम भारतामध्ये सुरू करण्यात आला आहे. आयव्हीओचे कार्यालय नवी दिल्ली येथे आहे. ह्या उपक्रमाद्वारे भारतामधून व्हॉलंटीयर निवडले जातात व अन्य देशांमध्ये पाठवले जातात. साधारणत: सध्या उपलब्ध असलेल्या व्हॉलंटीयरींगच्या संधी १ ते २ वर्ष कालावधीच्या आहेत. व्हॉलंटीयरकडे उपलब्ध असलेल्या क्षमता व स्थानिक यजमान संस्थांकडे असलेली गरज ह्यानुसार व्हॉलंटीयरची नियुक्ती केली जाते. व्हॉलंटीयरने त्याच्या कालावधीमध्ये ज्या यजमान संस्थेमध्ये नियुक्ती केलेली आहे अश्या संस्थेमध्ये पुर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करायचे असते. सध्या भारतीय व्हॉलंटीयरसाठी पात्रता निकष म्हणून पदव्युत्तर पदवी, किमान ३ वर्षांचा कामाचा अनुभव व इंग्रजीचे ज्ञान आवश्यक आहेत. त्याचप्रमाणे संगणकाचे व इंटरनेटचे किमान कामचलाऊ ज्ञान असणेही अत्यावश्यक असते. व्हॉलंटीयरना ह्या कालावधीसाठी व्हीएसओद्वारे एका माणसाचा स्थानिक खर्च भागू शकेल इतपत माफक मानधन, जाण्या येण्याचा विमान प्रवास, आरोग्या विमा, राहण्यासाठी घर अश्या मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात.
व्हीएसओचे ब्रीदवाक्य आहे “Sharing skills, Changing lives”. आपल्या कौशल्याच्या सहभागातून जीवनांमध्ये बदल. व्हॉलंटीयर जरी ह्या ब्रीदवाक्यानुसार सामाजिक विकासासाठी हातभार लावत असला तरी परदेशी व्हॉलंटीयरींग हा त्या व्यक्तीलाही अनेकांगाने समृध्द करणारा अनुभव असतो. आपल्यापेक्षा वेगळ्या संस्कृतीची नुसतीच जवळून ओळख होत नाही तर अपरिचित समाजव्यवस्थेत राहण्याची व काम करण्याची क्षमताही विकसित होतात. आपण ज्या सामाजिक परिस्थित वाढलो त्याकडे पाहण्याची एक व्यापक दृष्टी तयार होते व त्यातील उणीवाही समजू लागतात. विपरीत परिस्थितीमध्ये फक्त तगच धरून राहण्याची नव्हे तर यशस्वी होण्याची मानसिकता आपण विकसित करू शकतो. आपण ज्या देशांत असतो तेथीलच नव्हे तर अन्य देशांतून आलेल्या अनेक लोकांशी आपले संपर्क विकसित होतात आणि अनेक नवीन मित्र मैत्रिणी मिळतात. अश्या ह्या अनुभवांचा फायदा परदेशातील अन्य संधी मिळण्यात तर होतोच परंतु परत आल्यानंतरही “फॉरेन रिटर्न” चा शिक्का मिळाल्याचा फायदा होतो तो वेगळाच.
आता थोडे माझ्या अनुभवांबद्दल. मी जुलै २०१० ते जुलै २०१० ह्या एक वर्षाच्या कालावधीसाठी घाना ह्या पश्चिम आफ्रीकेतील देशात व्हीएसओ तर्फे व्हॉलंटीयर म्हणून काम केले. माझी नियुक्ती बोंगो ह्या देशाच्या उत्तर सीमेजवळील एका जिल्ह्याच्या स्थानिक जिल्हा पंचायतीमध्ये झाली होती. मी तेथे त्यांच्या स्थानिक अर्थव्यवस्था मंचा समवेत तेथील उपजीविका कार्यक्रमाच्या धोरण व नियोजन निश्चिती तसेच काही निवडक व्यवसायांच्या माध्यमातून गरीब लोकांसाठी कार्यक्रम धोरणे ठरवणे असे काम केले. माझे बरेचसे काम जरी स्थानिक शासकीय अधिकाऱ्यांबरोबर झाले असले तरी तेथील स्थानिक ग्रामवासींच्या समुहासोबत तसेच अन्य स्वयंसेवी संस्थांसमवेतही काम करता आले. इतकेच नव्हे तर अन्य क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या बाकीच्या व्हॉलंटीयर समवेतही काम केले. कामासोबतच स्थानिक उत्सव व समारंभांमध्ये सहभागी व्हायला मिळाले आणि आपल्या दिवाळीसारख्या सणांची, मराठी गाण्यांची तेथील स्थानिकांना ओळख करून देता आली. तिथे उपलब्ध असलेल्या स्थानिक धान्यापासून मी केलेल्या थालिपीठांची आठवण आजही माझे तेथील मित्र काढतात तेंव्हा त्याचे एक वेगळेच समाधान लाभते.
शरद पंत हा अमरावतीचा एक हरहुन्नरी तरूण. सिएरा लिओन ह्या आफ्रीकेतील देशातील माट्रू जॉंग नावाच्या एका छोट्या गावातील एका संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या एका सहकारी संस्थेचे व्यवसाय नियोजन तर त्याने केलेच पण त्याबरोबरच तेथील अन्य कार्यकर्त्यांना प्रशिक्षितही केले. तो म्हणतो, “मला व्हॉलंटीयरींगने काय शिकवले असेल तर तो म्हणजे संयम आणि लवचिकता.” पूर्णत: नव्याने फुटबॉल शिकूनही त्याने स्थानिक संघामध्ये स्थान मिळवलेच पण त्याबरोबरच आपले कराटेचे ज्ञान त्याने तेथील तरूणांना देण्यातही आढेवेढे घेतले नाहीत.
फक्त मी किंवा शरदनेच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक जणांनी उदाहरणार्थ रोहिणी जोग, स्वामीनाथन राजगोपाल (दोन्ही मुंबई), आशुतोष गोगटे (कोल्हापुर), सुवर्णा हुलावळे (पुणे) ह्या सर्वांनी हे व्हिएसओ व्हॉलंटीयरींग यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे.
स्वानुभवावरून मी हे निश्चित सांगू शकतो की जरी हा संपूर्ण अनुभव घेणे सोपे नसले तरी ते इतके कठीणही नव्हते. परंतु स्वत:च्या क्षमतेबद्दल आपण उगाचच घालून घेतलेल्या मर्यादा बऱ्याचवेळा चांगल्यासाठी ओलांडणे महत्वाचे असते आणि त्या ओलांडल्यामुळे आपली खरी क्षमता आपल्याला समजू शकते. त्यासाठी ओव्हरसीज व्हॉलंटीयरींग ही एक निश्चितच एक उत्तम संधी आहे.

अधिक माहितीसाठी काही वेबसाईट्स
आयव्हीओ- भारतातील व्हॉलंटीयरच्या निवड व नियुक्ती करणारी संस्था
www.ivoindia.org
व्हीएसओ इंटरनॅशनल- व्हॉलंटीयरींगचे जागतिक पातळीवर काम करणारी संस्था
www.vsointernational.org
माझ्या घानामधील अनुभवांचा ब्लॉग
Ghanaxp.blogspot.com
----------------------------