Tuesday, 21 April 2015

घानानुभवसुरुवात
व्हॉलंटरी सर्विस ओव्हरसीज (व्हिएसओ) ह्या संस्थेतर्फे परदेशातील व्हॉलंटीयरींगसाठी माझी २०१० साली निवड झाली आणि त्यांनी मला जे वेगवेगळे प्लेसमेंटचे पर्याय दिले होते त्यात पहिला होता घाना ह्या देशाच्या उत्तर सीमावर्ती भागातील बोंगो ह्या गावाचा. माझ्या प्लेसमेंटचे आणि माझे नातेसंबंध झट मंगनी पट शादी झाल्यासारखे जुळले खरे पण आमची एक वर्षाची ही नियोजनबध्द लिव इन रीलेशनशिप प्रत्यक्ष सुरू व्हायला तब्बल ५ महिन्यांचा कालावधी लागला. माझ्या पासपोर्टच्या नुतनीकरणाध्ये बरीच गुंतागंत झाली होती ती निस्तरेपर्यंत माझी घानामधील प्लेसमेंटची संस्था असलेल्या बोंगो जिल्हा परीषद आणि व्हिएसओ घानाच्या संबंधित पदाधिकाऱ्यांनीही न कंटाळता माझी वाट पाहिली.
दरम्यानच्या काळात घानाची आणि बोंगोची अधिक माहीती काढली आणि तेथे असलेल्या इतर व्हॉलंटीयर लोकांशी संपर्क तयार केला. हे करत असताना माझी उत्सुकता पणाला लागत असताना मात्र आजुबाजुच्या लोकांच्या "घाना म्हणजे साऊथ आफ्रीका का? तिथे मग जेवणाचं काय करणार? भाषा वेगळी असेल तर कसं जमेल? तिथे सगळे लोक काळेच असतील ना? वगैरे त्याच त्याच प्रश्नांची उत्तरे देताना प्रचंड वैतागही येत होता.
३ जुलै २०१० या दिवशी मी केनिया एअरवेजच्या विमानाने मी माझा पहिला वहिला परदेश प्रवास सुरू केला तो ही आफ्रीकेच्या एका अविकसित भागाच्या दिशेने. आंतरराष्ट्रीय विमानतळावर मला अवचित भेटलेल्या माझ्या वल्लभ वागळे ह्या वर्गमित्राने मला विमानकंपनीच्या काउंटरच्या दिशेने पाठवल्याच्या क्षणानंतर जवळजवळ प्रत्येक दिवशी काहीतरी आधी कधीही न घेतलेला नवीन अनुभव घेत एक वर्ष काढले. ह्या अनुभवांचा पल्ला नैरोबी विमानतळावर एका सिएरालिओनला जाणाऱ्या पाकिस्तानी व्यापाऱ्याच्या राज ठाकरेंविषयी असलेल्या फुटकळ प्रश्नांचे निरसन करण्यापासून हिप्पो आणि मगरींचा वावर असलेल्या काळ्या व्होल्टा नदीत एक डुबकी मारण्याच्या थरारापर्यंत आहे.
बोंगोत
घानाचे सर्वात मोठे व राजधानीचे शहर असलेल्या आक्रामध्ये पाच दिवस प्रशिक्षणामध्ये काढल्यावर माझी खरी परीक्षा सुरू झाली ती मी बोंगोला पोचलो तेंव्हा. तिथे गेल्यावर मी घेऊन गेलेल्या अपेक्षांचा भंग होऊ लागला. बोंगो जरी जिल्ह्याचे ठिकाण असले तरी तो घानाच्या समीकरणाप्रमाणे जिल्हा होता आणि ते एक फारच छोटे गाव होते. ही जिल्हा परीषद आपल्या कडच्या तालुक्यांच्या पंचायत समितीपेक्षाही लहान निघाली आणि तिला फारसे अधिकार नव्हते आणि कार्यक्षमताही जास्त नव्हती. आजूबाजूला शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प होते आणि वाचन, चर्चा असे बौध्दिक खाद्य  अजिबात मिळत नव्हते. माझे स्वतःचे भारतीय वळणाचे इंग्रजी आणि घानामध्ये बोलली जाणारी इंग्रजीची बोली ह्यामध्ये दोन वेगळया भाषा असाव्यात इतके अंतर होते. मूलतः अबोल आणि प्रसिध्दीपासून चार हात दूर राहणारा मी माझ्या परदेशीपणामुळे आणि भिन्न वंशामुळे आकर्षणाचा बिंदू ठरलो होतो. मुले आणि मोठी माणसेही येता जाता घरात आणि ऑफिसात डोकावून पाहत होते.
मला त्याचा त्रास व्हायला लागला. वेगवेगळ्या चवींचे पदार्थ खाण्याची मला आवड असली तरी वरण, भात, भाजी, पोळी असल्या शाकाहारी भारतीय आहारावर पोसलेल्या पिंडाला ह्यातले काहीही आता यापुढे एक वर्ष मिळणार नाही ह्याचीही जाणीव बोचू लागली.
इथे येऊन आपण चूक तर केली नाही ना असा नकारात्मक विचार करता करता माझे पहिले दोन आठवडे गेले आणि अचानक एका क्षणी साक्षात्कार झाला की नेमक्या हया सर्व गोष्टी अनुभवण्यासाठीच तर आपण येथे आलो आहोत. त्यानंतर मग ही सर्व आव्हाने स्वीकारताना एक मानसिक आनंद वाटू लागला. दररोज मग मी ठरवून नवीन लोकांना भेटणे, विविध ठिकाणी फिरणे, विविध स्थानिक पदार्थ खाणे हे सगळे करू लागलो. लोकांच्या आकर्षणाचे केंद्र असल्याचीही मजा लुटू लागलो. माझ्या कामात पूर्ण लक्ष देऊ लागलो. माझे अनुभव एका ब्लॉगवर लिहून ते भारतात घरच्यांना, मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना पाठवू लागलो. एक पूर्णतः कोरी वही मिळाल्यासारखे ते आयुष्य झाले.
व्हॉलंटीयरींग
व्हीएसओ ह्या ज्या संस्थेतर्फे मी तेथे गेलो होतो त्यांच्यामार्फत आलेले तब्बल ८० व्हॉलंटीयर त्या दरम्यान घानामध्ये होते. हे सर्वजण १२ विविध देशांतले लोक घानाच्या विविध भागांमध्ये पसरलेले होते. सर्वच जण आपापल्या घरापासून दूर आलेले असल्यामुळे व त्यातही बरेचसे देशाच्या अंतर्भागात असल्यामुळे मदतीची देवाणघेवाण त्यांच्या मध्ये सतत चालत होती. बऱ्याच जणांच्या ओळखी हळूहळू होत गेल्या आणि ह्या सर्व नेटवर्कची सुरुवातीपासूनच बरीच मदत झाली. त्यांच्या झालेल्या काही ओळखी कधी मैत्रीमध्ये बदलल्या गेल्या ते कळले सुध्दा नाही. विविध देशांची संस्कृती, त्यांच्या बोली, सण, वागण्याचे चलन, खाद्यपदार्थ अश्या गोष्टी एकाठिकाणी राहून समजल्या. दिवाळीसारखा सणही आमच्या ५ जणांच्या भारतीय गटाने ह्या सर्वांसमवेत साजरा केला.
तिथे पोचल्यानंतर दोन महीन्यांनी झालेली व्हॉलंटीयर कॉन्फरन्स हा एक महत्वाचा टप्पा होता. सर्व ८० व्हॉलंटीयर एका ठिकाणी त्या काळात फक्त भेटलेच नाहीत तर एकत्र काम करण्याचा अनुभवही मिळाला. विविध धोरणात्मक विषयांवर चर्चा करताना व निश्चिती करताना युके, नेदरलॅंड्स सारख्या विकसित देशांतील व भारत, फिलिपीन्स, घाना सारख्या विकसनशील देशांतील लोकांच्या विचार करण्याची व काम करण्याची पध्दतीतील फरक प्रकर्षाने जाणवले तसेच काही गोष्टीतील साधर्म्यही लक्षात आले. आम्ही त्यामध्ये काही विषयांसाठी पथनाट्ये बसवली तेंव्हा विविध देशातील लोक व त्यांच्या उच्चारांमुळे काम करताना बरीच धमाल आली.
सांस्कृतिक कार्यक्रमांची वेळ आली तेंव्हा आपल्या मराठी बाण्याच्या इज्जतीचा सवाल आहे हे लक्षात आलं आणि "ही चाल तुरूतुरू" सारखे सोपे गाणे शेवटी इंटरनेटवरून डाऊनलोड करून पाठ करून म्हणून दाखवले. नंतर प्रत्येक गॅदरींगच्या वेळेस मला त्या गाण्याची फर्माईश होऊ लागली. एकदा काही जणांनी आपल्याकडचा स्थानिक नृत्यप्रकार किंवा खेळ शिकव म्हणून गळ घातल्यावर त्यांना फुगडी घालायला लावली आणि भोवतीमध्ये नाचायला लावले होते. जरावेळ गरागरा फिरल्यावर सगळ्यांनी तुमच्या कडे नेहमी असंच स्ट्रेसफुल नाचतात का असा प्रश्न विचारला होता.
आफ्रिकेमध्ये काम करणे म्हणजे तुमच्या व्यावसायिकतेची खुप मोठी कसोटी असते. मुंबईमध्ये वाढलेल्या मला ह्याचा प्रचंड त्रास सुरूवातीला होत असे. कामाच्या निमीत्ताने कोणाला भेटल्यावर हाय हॅलोनंतर लोक थेट कामाला हात न घालता तब्ब्येत, तुमचे नातेवाईक, मित्र, परीसर ह्यांच्या चौकशीमध्ये प्रचंड वेळ घालवतात. जर कोणी थेट कामाच्या विषयाला हात घातला तर ते वाईट समजले जाते. भरभरून बोलणे हा घानायन माणसांचा स्थायी भावच आहे जणू. फोनवरही तोच प्रकार असे आणि जर तो फोन दुसऱ्याने केलेला असेल तर फारच. लोकांचा वेळेबद्दलची जाणीवही अशीच अतिभोंगळ वाटावी अशी होती. तेथे विनोदाने लोक त्यांच्या वेळेच्या भानाला "घाना मे बी टाईम (जीएमटी)" असं म्हणतात. अर्थात हे सर्व बोंगो सारख्या गावात अधिक होते. जसे तुम्ही शहरांच्या व विविध आर्थिक उलाढालींच्या जवळ जाल तसे ह्या सर्व प्रकारांचे प्रमाण कमी होत जाई. बोंगोमध्येही मला कामावर अतिशय जास्त लक्ष देणारी, वेळ पाळणारी, बोलण्याचा फापटपसारा न ठेवणारी बरीच माणसे भेटली परंतु त्यासाठी काही वेळ जावा लागला. अश्या परिस्थितीत काम करणे व करवून घेणे हेच खुप मोठे होते असा मला आता राहून राहून वाटते. अर्थात नाण्याच्या दुसऱ्या बाजूने विचार केल्यास जीवनशैली व वैचारीक पध्दतीतील फरक लक्षात घेतला पाहीजे व त्याअनुषंगानेच त्याला पाहीले पाहीजे हे ही समजले.
खाद्ययात्रा
घानाला जाण्याआधी स्वयंपाकघरातील माझी झेप इन्स्टंट नुडल आणि पोहे ह्याच्या पलीकडे कधी गेली नव्हती. सोबत नेलेले मराठीतील "पुरूषांसाठी सोपे पाकशास्त्र" हे पुस्तक खुप उपयोगी ठरले परंतु एका मर्यादेपर्यंतच. कारण बाजारात फिरल्यानंतर लक्षात येत गेले की आपल्या जेवणातील बरेचसे साहीत्य तेथे उपलब्धच नव्हते. चवळीसारखे कडधान्य होते परंतु डाळी हा प्रकार अजिबात नव्हत्या. बटाटयाचे तर नामोनिशाण बोंगोच्या बाजारात नव्हते. आणि मग सुरू झाला स्वयंपाकघरातील प्रयोगांचा सिलसिला. वेगवेगळ्या स्थानिक पालेभाज्या, कंद वगैरे जिरे मोहोरीच्या फोडणीमध्ये जाऊ लागले. शेंगदाण्याच्या कुटाऐवजी स्थानिक बाजारात मिळणारी शेंगदाणा पेस्ट वापरून रस्सा आणि ग्रेव्ही तयार होऊ लागला. ती पेस्ट पावाला लावून त्याच्या दोन फाकांमध्ये मुक्त संचार करणाऱ्या गिनीफाउलच्या अंड्याचे पिवळे जर्द रूचकर आम्लेट घालून एक हेल्दी नाश्ता तयार करू लागलो. केमोल्गा नावाच्या लाल रंगाच्या ज्वारीचे पीठ एकदा दळून आणून त्याची मस्त थालिपीठे तयार करून स्थानिक लोकांना खाऊ घातली.
स्वतः बल्लवगिरी करताना स्थानिक खाद्यपदार्थांचाही आस्वाद घेतला. बरेचसे पश्चिम आफ्रिकन मुख्य जेवण म्हणजे शिजवलेल्या पीठाचे गोळे कुठल्यातरी रश्श्यात बुडवून खाण्याचा प्रकार असतो. देशोदेशीच्या पिकांप्रमाणे त्यामध्ये बदल होत जातो. घानाच्या उत्तर भागामध्ये हे गोळे ज्वारी, बाजरी, मक्याचे असतात तर दक्षिण भागामध्ये ते याम, राजेळी केळी इ चे असतात. आफ्रीकेमध्ये शाकाहार ही संकल्पना अस्तित्वात नाही आणि बऱ्याचश्या पदार्थांमध्ये सुक्या मासळीचा, मांसाचा सर्रास वापर केलेला असतो. तेथील काही पदार्थ हे आंबवून केले जातात. तर बऱ्याच पदार्थांमध्ये वापरला जाणारा दावादावा नावाचा एक मसाल्यासारखा पदार्थ विचित्र उग्र वासाचा असतो. कच्चे पामतेल, शिआ बटर, शेंगदाणा तेल अश्या तेलांचा वापर हे रस्से शिजवताना किंवा वरून घालून केला जातो. ह्या सर्वच खाद्यपदार्थांची सवय मला जरी करता येऊ शकली नाही तरी त्यातील रेड रेड, ओमो तुओ, कोंटोमीरे, ग्मेंब्सा असे काही पदार्थ थोड्या कालावधीनंतर आवडू लागले. आफ्रीकन खाद्यजीवन हा एक स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकेल इतका मोठा आहे.
आजारपण
जिथे आपले घरचे असे कोणीही नाही अश्या ठीकाणी आजारी पडण्याचा अनुभवही खुप शिकवून गेला. जेंव्हा सर्व लोक नाताळच्या सुट्टीची मजा घेत होते तेंव्हा मी मात्र मलेरीयानी ग्रस्त होऊन घरात झोपून राहीलो होतो. तापानी फणफणलो असताना एकट्याने १५ किमी वरच्या तुफान गर्दीने भरलेल्या हॉस्पिटलमध्ये शेअर टॅक्सीने जाऊन डॉक्टरकडून तपासूण घेणे, औषधे घेणे असे उद्योग करावे लागले होते. हे सर्व करताना शारिरीक आणि मानसिक शक्तीचीही परीक्षा घेतली गेली. पाच महिन्यांनी दुसऱ्यांदा जेंव्हा परत एकदा मलेरीयाने आजारी पडलो तेंव्हा मी बोंगो पासून १३० किमी वर असलेल्या तमाले ह्या एका मोठ्या शहरात माझ्या एका राज नावाच्या भारतीय व्हॉलंटीयर मित्राकडे होतो. ह्यावेळचा अनुभव माणसातील जागतिक स्तरावरच्या चांगुलपणाची जाणीव करून देणारा आणि म्हणूनच ह्रदयस्पर्शी होता. चार विविध देशांच्या नागरीकांनी त्या वेळी माझी थेट पध्दतीने काहीना काही प्रकारे मदत केली होती तर आणखी दोन देशांच्या नागरीकांनी फोनद्वारे संपर्कात राहून माझ्याबद्दल चिंता व्यक्त करून लागेल त्या मदतीची हमी दिली होती.
प्रवास
घाना हा देश तसा अगदी छोटा म्हणजे आकाराने महाराष्ट्राच्या अर्धाच, तरीही रस्ते व सार्वजनिक वाहतुकीची साधने भारताच्या तुलनेमध्ये कमी विकसित असल्यामुळे फिरणे फार सोपे नाही. अर्थात कामाच्या निमित्ताने आणि पर्यटनासाठीही ह्या देशात मी एका वर्षात बरेच फिरू शकलो. गिनीफाउल ह्या पक्ष्याच्या व्हॅल्यू चेनचा अभ्यास करताना, तेथील काही पक्ष्यांच्या खरेदीविक्रीसाठी प्रसिध्द असलेल्या ग्रामीण बाजारांपासून आक्रा शहराच्या अतिशय गर्दीच्या आणि नवख्या परदेशी व्यक्तींना फिरण्यासाठी कठीण समजल्या जाणाऱ्या मकोला मार्केटच्या गल्लीबोळांमध्ये जाऊन पक्ष्यांचे स्टॉल शोधून विक्रेत्यांशी बोलण्याच्या ह्या शोधमोहीमेची मजा काही औरच होती. मी आणि माझा भारतीय व्हॉलंटीयर मित्र राहुल चक्रबोर्ती, अश्या दोघांनी मिळून केलेल्या सात दिवसांच्या बॅकपॅक सहलीत मुख्यत्वे विविध अभयारण्यांना भेटी दिल्या. घानामध्ये मसाई मारा सारखी वर्ल्ड क्लास वनपर्यटनस्थळे नसली तरी तेथील मोले राष्ट्रीय उद्यानामध्ये जंगली आफ्रीकन हत्तीं चालत चालत जवळून पाहणे आणि काकूम ह्या विषुववृत्तीय अरण्यातील कॅनोपी वॉकवे ह्यांचे वर्णन शब्दांनी कितीही केले तरी अपुरेच ठरेल.
धर्म आणि धार्मिकता
धार्मिक फरक व त्यामुळे होणारे विसंवाद जागतिक पातळीवर तीव्र होत असताना घानामध्ये ह्यासंबंधाने मला अनेक मजेशीर गोष्टी पहायला मिळाल्या. ख्रिश्चनबहूल देश असला तरी धार्मिक बाबतीत घाना म्हणजे एक खुप मोठी मिसळ आहे. येथे लोकांची धार्मिक निष्ठा फारशी तीव्र नसते. एकाच घरामध्ये आई व वडील, दोन भाऊ भिन्न धर्माचे असणे शक्य असते. लोक आजही तेथील काही पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या मंत्र, तंत्र, चेटूकावर आधारीत आफ्रिकन परंपरांना महत्व देतात. मुसलमान लोकांना त्यातल्या त्यात जास्त कडवे समजले जाते असे असले तरी तिथे अल्लाचे नाव दिलेले लेडीज फॅशन शॉप दिसले. बरेच मुस्लिम लोक चर्च मध्ये जाऊनही प्रार्थना करताना दिसत असत. मल्लम ह्या नावाने ओळखले जाणारे बरेच मुस्लिम धर्मीय तांत्रिक तेथे लोकप्रिय आहेत व त्यांच्याकडे सर्वधर्मीय लोक जातात. एकदा आक्रा शहराच्या बाह्य भागामध्ये फिरत असताना एका हिंदू मंदीराचा कळस दिसला. ते मंदीर म्हणजे आफ्रिकन हिंदू मोनॅस्टरी ह्या स्थानिक संप्रदायाचे निघाले. ह्या संप्रदायाचे संस्थापक प्रमुख स्वामीजी घनानंद हे घानाचे स्थानिक असून त्यांनी हिंदू धर्माच्या आकर्षणातून भारतात येऊन दीक्षा घेतलेली आहे. तेथील संध्याकाळची आरती म्हणजेच शिस्तबध्द पध्दतीने आफ्रिकन वाद्यांच्या साथीने घानायन उच्चारांमध्ये म्हटल्या गेलेल्या संस्कृत प्रार्थना ऐकणे हा एक अभुतपूर्व अनुभव होता.
संस्कृती
संगीत व नृत्य ह्यांच्याशिवाय आफ्रिकेच्या कुठल्याही भागाचे लोकजीवन अपूर्ण आहे असेच म्हणावे लागेल. घानामध्ये ते आहेच परंतु त्याला समृध्द अश्या परंपराही आहेत. त्या देशातील असांते ह्या राजवटीने त्याला उत्तेजन दिले आणि त्यांचे दरबारी समूह नृत्य शास्त्रीय प्रकाराच्या जवळ जाणारे आहे. ह्या नृत्यप्रकारामध्ये आशियाई नृत्यशैलीप्रमाणेच हातांच्या हालचालींना विशिष्ट अर्थ असतात. द्जेंबे, बोंगो, जायंट ड्रम्स अशी विविध तालवाद्ये, कोलोगो सारखी तंतूवाद्ये, शिंगे व पोकळ भोपळ्यांपासून केलेली वाद्ये येथे लोकप्रिय आहेतच. परंतु मला खास आवडले ते झायलोफोन नावाचे बांबूच्या किंवा लाकडी पट्ट्यांपासून केलेले संतूर प्रकारातील वाद्य. हे घानाच्या वायव्य भागात अधिक प्रचलित आहे. तेथील एका स्थानिक चर्च मध्ये मी अनुभवलेला झायलोफोनच्या साथीने केलेला संगीतमय ईस्टर मास मी कधीच विसरू शकणार नाही. आधुनिक पाश्चात्य संगीताचा प्रचंड प्रभाव तेथील सध्याच्या तरूण पिढीवर आहे. असे असले तरी बरेच तरूण संगीतकार पारंपरीक संगीत व नृत्याच्या पुनरूज्जीवनासाठी प्रयत्न करत आहेत ही जमेची बाजू आहे. घाना सरकारचा सांस्कृतिक विभाग दर वर्षाआड राष्ट्रीय कला व संस्कृती उत्सव देशाच्या विभागात साजरा करत असतो. तो मी तेथे असताना पहायला मिळणे ही एक पर्वणीच होती.
भारतीय असणे
एकंदरीत घानामध्ये भारत व भारतीयांविषयी प्रतिमा चांगली आहे. खूप मोठ्या प्रमाणावर भारतीय तेथील मोठ्या शहरांमध्ये जाऊन व्यवसाय व नोकरी करत आहेत. तरी मी जिथे होतो तेथे मात्र लोकांनी भारतीयांना फारसे बघितले नसल्याने मला त्यांच्यापेक्षा उजळ वर्णाचा व सरळ केसाचा असल्याने लोक गोराच समजत असत. मागील पिढीमध्ये भारतीय फिल्म व संगीताची लोकप्रियता बरीच होती. व्हीएसओचा ड्रायव्हर, ईस्सा, मी कधीही भेटलो की मला बरीच हिंदी गाणी म्हणून दाखवत असे. एकदा मला बोंगोमध्ये फिरत असताना अचानक एका माणसाने "नमस्ते" म्हणून हाक मारली तेंव्हा मी चमकलोच. तो माणूस घानाच्या सैन्यदलात काम करत असताना एकदा कुठल्या तरी देशात भारतीय फौजेसोबत एकत्र शांतता सेनेचे काम केले होते आणि बरोबरच्या भारतीय जवानांसोबत राहून तो बरेच हिंदी शब्द शिकला होता. तेथील सुशिक्षित लोकांमध्ये भारताबद्दल बरेच कुतूहल आहे आणि जाती व्यवस्था, महात्मा गांधी, येथील आर्थिक विकासाचा अधिक दर, तरीही असलेली गरीबी अश्या अनेकविध विषयांवरील त्यांच्या प्रश्नांना मला उत्तरे द्यावी लागत असत.
अखेर
आयुष्याच्या अश्या विविधांगांना स्पर्शून जाणारे हे एक वर्ष पटकन संपून गेले असे वाटले. अनुभवातील नावीन्य कायमचे राहणारे नाही हे अर्थात जाणून असलो तरी अजुन एखादे वर्ष घानामध्ये रहायला पाहीजे होते असे परतीच्या वेळेस वाटायला लागले ह्याचाच आनंद अधिक आहे.